जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ऐतिहासिक पदभरती होणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे. या मेगाभरतीमध्ये केवळ नियमित पदेच नव्हे, तर बाह्ययंत्रणा आणि मानधनावरील पदांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे:

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विभागातील विद्यमान पदांचा आढावा घेण्यात आला असून काही पदे रद्द करून नव्या पदांची भर घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत.
दरम्यान, या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी रोजगाराची संधी ठरणार आहे. महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.












