जळगाव लाईव्ह न्यूज । एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅस बुकिंगचे नवे नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, सर्व गॅसधारकांसाठी आधार बायोमेट्रिक ई-केवायसी (e-KYC) करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचे गॅस बुकिंग थांबवले जाऊ शकते किंवा त्यांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

नियम का लागू करण्यात आला?
सरकारने हा निर्णय बोगस गॅस कनेक्शन आणि चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या बुकिंगला आळा घालण्यासाठी घेतला आहे. अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त कनेक्शन असल्याचे किंवा व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी Indane, Bharat Gas आणि HP Gas ने आता आधार केवायसी अनिवार्य केले आहे.

e-KYC कशी करायची?
एलपीजी गॅससाठी e-KYC प्रक्रिया अतिशय सोपी असून ग्राहकांना खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने ती पूर्ण करता येईल:
जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन आधार क्रमांक द्यावा
त्यानंतर बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) व्हेरिफिकेशन करावे
किंवा संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट/मोबाइल अॅपवर लॉग इन करून आधार लिंक करावा
ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करावी
सरकारच्या या नव्या नियमामुळे भविष्यात गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी लवकरात लवकर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











