शेतकऱ्यांसाठी चिंतेची घंटा! यंदाच्या मान्सून पावसाबाबत चिंताजनक अंदाज समोर..

एप्रिल 8, 2026 3:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदाचा मान्सून कसा असेल याची चिंता सतावू लागली आहे. अशातच यंदाच्या मान्सूनच्या पावसाबाबत चिंताजनक अंदाज समोर आला आहे.

rain 1

खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट वेदर’ने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून हंगामात सुमारे ९४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तो सरासरीपेक्षा सुमारे ६ टक्के कमी राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

सामान्यतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस नोंदवला जातो. परंतु यंदाच्या हंगामात ८१६ मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे.मॉन्सूनमध्ये ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी मानला जातो. परंतु यंदा मात्र ९० ते ९५ टक्केच पाऊस राहील, असा शक्यताही स्कायमेट वर्तवली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनच्या सुरुवातीला जून महिन्यात पाऊस सामान्य राहण्याची शक्यता असली तरी जुलैपासून त्यात घट होण्याचे संकेत आहेत. विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मान्सून कमकुवत होऊन पावसाची तूट अधिक जाणवू शकते.

दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेती आणि पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, पूर्व आणि ईशान्येकडील बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये तुलनेने चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मान्सूनच्या हालचालीकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागून राहणार आहे. ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now