जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. आता तर चोरांनी हद्दच केलीय. रावेर येथील स्वीकृत नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घरफोडीच्या चोरट्यांनी ११ तोळे सोने, २५० भार चांदी आणि १० लाख रुपये रोख लांबवले. विशेष म्हणजे नगरसेवक पाटील यांचे घर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच आहे. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रावेर येथील नगरसेवक दिलीप पाटील रामबाग मैदान परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची पोत, अंगठ्या, चपला हार असे सुमारे ११ तोळ्यांचे दागिने, २५० भार वजनाचे चांदीचे तोडे चोरून नेले.

दिलीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नुकतेच त्यांचे गट क्रमांक ७७६/१ हे शेत विकले होते. या व्यवहाराचे आलेले १० लाख रुपये त्यांनी घरातच ठेवले होते. चोरट्यांनी दागिन्यांसोबतच ही रोकडही लंपास केली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. नगरसेवक पाटील यांचे घर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असताना चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली.











