जळगाव लाईव्ह न्यूज । इराण-इस्रायल तणावाने आता ‘गॅस वॉर’चे रूप धारण केल्याची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून कतार आणि सौदी अरेबियाच्या तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले. कतारमधील मोठ्या LNG प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता असून, देशाच्या गॅस पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ५० टक्के नैसर्गिक वायू आयात करतो. त्यात कतारचा मोठा वाटा असून, दरवर्षी १२ ते १३ मिलियन टन LNG भारतात येतो. अशा परिस्थितीत कतारमधील उत्पादनात घट झाल्यास भारताला पर्यायी बाजारातून महागड्या दरात LNG खरेदी करावा लागू शकतो.

ऊर्जा निर्मिती, खत उद्योग, औषधनिर्मिती, प्लास्टिक, तसेच काच आणि अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर LNG वर अवलंबून आहेत. पुरवठा खंडित झाल्यास या क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादन घट, उद्योगांवर ताण आणि बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, होर्मुज जलमार्गावरील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर आधीच १२० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. ही परिस्थिती आणखी बिघडल्यास दर २०० डॉलरपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून, सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो.एकूणच, मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम आता केवळ राजकीय न राहता आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बनत चालला आहे.












