जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील धार येथे पैशांच्या व्यवहाराच्या वादातून महिलेसह पतीला अमानुष मारहाण केल्याची घटना घडलीय. यात वत्सलाबाई रघुनाथ ठाकरे (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
धार (ता. धरणगाव) येथे वास्तवास असलेल्या वत्सलाबाई ठाकरे या १४ मार्च रोजी सायंकाळी आपल्या घरासमोर होत्या. या वेळी आरोपी कैलास ठाकरे याने पैशांची मागणी केली, मात्र वत्सलाबाई यांनी “मला तुमचा पैशांचा व्यवहार माहित नाही” असे उत्तर दिले. यावर रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने वत्सलाबाई यांच्यावर प्रहार केला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

एवढ्यावरच न थांबता, आरोपीने वत्सलाबाई यांचे पती मध्यस्थीसाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत पाठीवर, पोटावर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे.याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कैलास ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे हे करीत आहे.











