गॅस दरवाढीने चालक हैराण ; रिक्षा भाडेवाढीने प्रवाशांना फटका

मार्च 14, 2026 1:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसचा तुटवडा आणि गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी आणि पंपांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून सिलेंडरसाठी थांबावे लागत असून ऑनलाईन बुकिंगही सुरळीत होत नसल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

gasriksha

जळगाव शहरातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शहरात एकूण तीन एलपीजी गॅस पंप असले तरी त्यापैकी दोन पंपांवरील गॅस संपल्याने सध्या केवळ एकाच पंपावर पुरवठा सुरू आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, गॅसचा तुटवडा असतानाच एलपीजीच्या दरात अचानक वाढ झाल्याने रिक्षा चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही दिवसांपूर्वी गॅसचा दर किलोमागे सुमारे ५५ रुपये होता, मात्र तो आता जवळपास ९० रुपयांपर्यंत पोहोचल्याने रिक्षा चालवणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

गॅस दरवाढीमुळे रिक्षा भाड्यातही वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवर दुहेरी आर्थिक ताण पडत आहे. एकीकडे महागाईचा वाढता भार आणि दुसरीकडे इंधन दरवाढ यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now