जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँक कर्मचारी संघटनांपासून ते शेतकरी गटांपर्यंत विविध संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.

नवीन कामगार कायदे, प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करार, मनरेगा योजनेंतील बदल तसेच BV-GRG संदर्भातील मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत हा बंद पुकारण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे बँकिंग सेवा, काही सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होऊ शकतो.

काही राज्यांमध्ये संपाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीनुसार काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन किंवा व्यवस्थापनाकडून घेतला जाऊ शकतो.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी प्रवास किंवा इतर महत्त्वाच्या कामांचे नियोजन करताना स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











