जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच धरणगाव पाळधी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यात लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, पाळधी येथे शुक्रवारी मध्यरात्री गोविंदनगर व साई बाबा मंदिराजवळ या दोन ठिकाणी तीन घरात घरफोडी होऊन त्यात लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. यात गोविंद नगर येथील रहिवासी रिक्षाचालक अरमान सय्यद यांचा घराचा कडीकोयंडा तोडून घराच्या कपाटातील ६ तोळे सोने व २५ हजार रोख अशी रक्कम चोरट्यांनी लांबवली.

साईबाबा मंदिराजवळील रहिवासी रमेश कुंभार यांच्या घरातून १ लाख रुपये रोख, ५ ग्रॅम सोने, १५ भार चांदी तर राठोड यांच्या घरातून १० हजार रुपये रोख लंपास झाले आहे. गोविंदनगर येथील घरफोडी सकाळीच समजली तर साईबाबा मंदिराजवळ झालेली घरफोडी दुपारी २ वाजता उघडकीस आली. डॉग स्कॉड व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
तसेच चोपडा भागाचे पोलिस उप विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, धरणगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. सुनील पवार, पाळधीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे यांनी भेट देऊन पाहणी करून सूचना केल्या. या बाबत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधीचे दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.












