जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२५ । दसऱ्यानंतर सोने-चांदी दरात घसरण दिसून आली होती. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदीचे दर कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही धातूंमध्ये आता पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याचे दर सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. तर चांदीचा दरही दीड लाखाच्या वर गेला. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे.

दिवाळी या झगमगणाऱ्या आनंदाच्या सणाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. १८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरूवात होईल. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण सोने-चांदी खरेदी करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात वाढ झाली. आज ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता जीएसटीसह २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२४,१०० रूपये मोजावे लागतील. सोबतच आज चांदी दरात ५०० रुपयाची वाढ झाली. यानंतर चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ५४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
सोन्याच्या दारात आणखी मोठी वाढ होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. सोन्याने चांदीच्या वाढलेल्या दरामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.अमेरिकेत शटडाऊन, टॅरिफचा फटका जागतिक बाजाराला बसला आहे. त्याशिवाय युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळेही सोन्याचे दर वाढले आहे.












