जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२५ । भुसावळ शहर हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. येथे पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सख्या सासऱ्यासह मामे सासऱ्यावर जावयाने प्राणघातक हल्ला करत मामे सासऱ्याची हत्या केली आहे. शेख समद शेख इस्माईल (वय. ४०)असं हत्या झालेल्या मामे सासऱ्याचं नाव असून सुभान शेख भिकन कुरेशी असे हत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. शहरातील अयान कॉलनी परिसरात ही घटना घडली असून सदर घटनेमुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील महामार्गालगत अयान कॉलनी भागात शुक्रवारी रात्री ७.३० वाजता शेख शुभान शेख भिकन याच्या घरात वाद झाला. शेख शुभान यांची पत्नी धुळ्याची असून त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे धुळे येथून त्यांचे सासरे शेख जमील शेख शकील व त्यांची पत्नी भुसावळला आले. मात्र, ते कंडारी येथे शालकाकडे गेले. तेथून शेख समद व शेख जमील अयान कॉलनीत जावयाकडे काय वाद झाला याबाबत चौकशी करायला गेले. तेथे त्यांच्यात शाब्दिक वाद व बाचाबाची झाली.
या वेळी शेख समद याच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना ग्रामीण रुग्णालय व तेथून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत शेख शुभान व त्याचे सासरे शेख जमील शेख शकील हे जखमी झाले आहे. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. अजयराख उपचार करता आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला जाईल, असे डीवायएसपी गावीत यांनी सांगितले.












