जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता आणि नवीन जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, सोने दरातील वाढ सुरूच आहे. दररोज सोने नवनवीन उच्चांक गाठत आहे. दरम्यान आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी बाजार उघडताच सुवर्णपेठ जळगाव मध्ये सोने दरात प्रति तोळा ८०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा तोळा आता १ लाख ५ हजाराच्या वर गेला आहे. दुसरीकडे चांदी दर स्थिर दिसून आला. तुम्हीही आज खरेदीला सराफ बाजारात जाणार असाल त्यापूर्वी दर तपासून घ्या..

मागच्या काही दिवसापासून सोने दरात सातत्याने वाढ दिसून येत असून यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. आज जळगाव सराफ बाजारात सकाळच्या सत्रात कालच्या किमतीपेक्षा सोने दरात ८०० रुपयांची वाढ होऊन १ लाख ५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर जीएसटीसह सोने प्रति तोळा १ लाख ८ हजार ७६८ रुपयेवर पोहोचले आहे

दरम्यान जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे. आज दुसरीकडे चांदी दरात मात्र कुठलीही वाढ किंवा घट झालेली नाहीय. सलग दुसऱ्या दिवशी चांदी स्थिर आहे. आज चांदीचा एक किलोचा दर जीएसटी विना १२४००० रुपये इतकी आहे.
दरवाढीचे कारण काय?
एकीकडे गणेशोत्सव सुरु असून आगामी नवरात्री, दसरा आणि दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली. या दरवाढीमागे दोन प्रमुख कारणे दिली जात आहेत. एक म्हणजे, सणासुदीच्या हंगामापूर्वी (दसरा, दिवाळी) सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर लवकरच ऐतिहासिक पातळी गाठू शकतात. दुसरे कारण म्हणजे, आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय तणावामुळे (ट्रम्प टॅरिफ) गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत.












