जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । आज सोने दरात पुन्हा वाढ झाली आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये आज सोने दरात ६०० रुपयाची वाढ झाली असून यामुळे सोन्याचा दर नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे सलग चार दिवसापासून चांदीचा दर मात्र स्थिर आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.

काय आहे आज सोन्याचा दर?
जळगाव येथील सुवर्णनगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीशिवाय १ लाख २००० रुपयांवर पोहोचला आहे, तर जीएसटीसह याच सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ५ हजार ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ९३ हजार ४३० रुपये असून, जीएसटीसह तो ९६ हजार २३२ रुपयांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे चांदीचा दर मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून स्थिर दिसून आला. सध्या एक किलो चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख १८००० रुपयांवर आहे. तर जीएसटीसह ती १ लाख २१ हजार ५४० रुपयांवर पोहोचली आहे.
जळगाव सराफ बाजारात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (दि २५ ऑगस्ट) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ६०० रुपये प्रति तोळा इतका होता. मात्र यांनतर सोने दर वाढले. मागच्या चार दिवसात सोने दर १४०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत वाढले आहे. मात्र दुसरीकडे चांदी स्थिर दिसून आली.
दरवाढीचे कारण?
या भाववाढीमागे विविध आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. टॅरिफ इम्पॅक्टमुळे देखील सोने दरावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारसे यश आले नाही. या जागतिक अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे, असे सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “फेडरल बँकेचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
सध्या सण-उत्सवाच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा महिलांचा उत्साह नेहमीच असतो. मात्र, सध्याच्या अनपेक्षित भाववाढीमुळे ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे.












