जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन पाटील । मागच्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला आहे. आजच्या (दि २१ ऑगस्ट) तारखेपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम प्रकल्प मिळून ५४ टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्यावर्षीच्या याच दिवशी ४१.२० टक्के जलसाठा होता. तर जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे. गुडन्यूज म्हणजे गेल्या आठवड्यात शून्यावर असेलल्या तीन धरणांच्या जलसाठ्यात देखील वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईची चिंता काहीशी मिटली आहे.

यंदा पावसाळ्याच्या जून आणि जुलै या दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यातच अर्धा ऑगस्ट महिना उलटला तरी पावसाचा थांगपत्ता नव्हता. धरणक्षेत्रातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अग्नवती, भोकरबारी आणि बोरी धरणातील जलसाठा शून्यावर होता. जिल्ह्यातील एकमेव सुखी धरणाने शंभरी गाठली होती. तर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प असलेल्या गिरणा आणि वाघूर धरणात ६० टक्केपेक्षा अधिक जलसाठा होता.

मात्र, २० दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने १५ ऑगस्टपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केलं. मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. १५ ऑगस्टपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला.
गेल्या आठवड्यात म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण जलसाठा ४८.३२ टक्के होता होता. मात्र यानंतर झालेल्या पावसानं आता ही टक्केवारी ५४.०७ टक्क्यावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात शून्य टक्के जलसाठा असलेल्या अग्नवती, भोकरबारी आणि बोरी धरणांच्या जलसाठ्यातही वाढ झाली.
तर सुकीनंतर अंजनी आणि मन्याड धरणांनी शंभरी गाठली आहे. दिलासादायक म्हणजेच जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प गिरणा आणि वाघूर धरणांचा जलसाठा देखील ७० टक्केच्या वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा कुठलाही अलर्ट नसून मात्र आगामी काही दिवसात पाऊस झाल्यास जिल्ह्यातील जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत (आज २१ ऑगस्टपर्यंत ) उपलब्ध असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा :
हतनूर – ३८.०४ टक्के
गिरणा – ७१.०३ टक्के
वाघूर – ६३.४७ टक्के
अभोरा – ८४.५३ टक्के
मंगरूळ- ९७.२७ टक्के
हिवरा – ४३.१२ टक्के
सुकी – १०० टक्के
मोर – ७५.४९ टक्के
बहुळा – ६०.४३टक्के
अग्नावती – १२.४९ टक्के
तोंडापूर – ५७.१८ टक्के
अंजनी – १०० टक्के
गूळ – ५४.३१ टक्के
बोरी – २४.२४ टक्के
भोकरबाडी : १३. २६ टक्के
मन्याड – १०० टक्के
शेळगाव बॅरेज – ३.८३ टक्के








