गेल्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १२३ मिमी पाऊस ; आगामी दिवस कशी राहणार पावसाची स्थिती?

ऑगस्ट 20, 2025 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून यामुळे मुंबईसह बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान मागच्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून शेती पिकांचेही मोठं नुकसान झाले. आहे. दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात आगामी दोन ते तीन दिवस काही अंशी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याचा अंदाज आहे.

rain monsoon

जळगाव जिल्ह्यात मागच्या जवळपास २० दिवसापासून पावसाने दडी मारली होती. यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली होती. हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज दिला होता. मात्र, १४ ऑगस्टपर्यंत पावसाची मोठी तूट निर्माण झाली होती. ही तूट तब्बल ८४ टक्क्यांवर पोहचली होती. मात्र, गेल्या चार दिवसात झालेल्या दमदार पावसाने ही तूट भरून, १९ ऑगस्टपर्यंत या महिन्यातील पावसाची सरासरी तब्बल ११४ टक्क्यांवर पोहचली आहे. तसेच १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे एकूण तूट ही ३९ टक्क्यांपर्यंत पोहचली होती. चार दिवसात झालेल्या १२३ मिमी पावसामुळे ही टक्केवारी ८८ टक्क्यांवर पोहचली.दरम्यान गेल्या चार दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असला तरी काही तालुक्यांमधील मोठी तूट भरली असली तरी अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पावसाची तूट कायम आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज कुठलाही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला नाहीय. मात्र आगामी दोन ते तीन दिवस काही अंशी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पावसाने उसंती घेतल्याचं दिसून आलं. तर आज बुधवारी सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले. मात्र दुपारनंतर किंवा सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. दोन तीन दिवसानंतर मात्र पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याचा अंदाज आहे.

२६९ गावात १२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील २६२ गावांमधील १५ हजार ६९५ शेतकऱ्यांच्या १२ हजार २३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे एरंडोल तालुक्यात झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now