जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओडिसीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘ओडिसी सन’ लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ८१,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी टॉप मॉडेलसाठी ९१,००० रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

ओडिसीने भारतीय बाजारपेठेत आपला वाहन पोर्टफोलिओ वाढवत अधिकृतपणे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ओडिसी सनमध्ये प्लस-साईज एर्गोनॉमिक डिझाइन आहे, जे आरामदायी राइड तसेच स्पोर्टी लूक प्रदान करते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर एकूण ४ रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये पॅटिना ग्रीन, गनमेटल ग्रे, फँटम ब्लॅक आणि आइस ब्लू यांचा समावेश आहे.

ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये यामध्ये कीलेस स्टार्ट-स्टॉप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डबल फ्लॅश रिव्हर्स लाईटसारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. स्कूटरमध्ये ड्राइव्ह, पार्किंग आणि रिव्हर्स असे तीन रायडिंग मोड्स आहेत, जे दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरतात.
ओडिसी सनमध्ये एलईडी लाइटिंग, एव्हिएशन-ग्रेड सीटिंग आणि सीटखाली ३२ लिटर स्टोरेज स्पेस आहे. समोर टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक मल्टी-लेव्हल अॅडजस्टेबल रिअर शॉक अॅब्सॉर्बर सस्पेंशन दिले आहे, तर ब्रेकिंगसाठी पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत.
मजबूत रेंज आणि वेग
स्कूटरमध्ये २५०० वॅटची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे आणि ती सुमारे ताशी ७० किमीचा जास्तीत जास्त वेग गाठू शकते. ओडिसीने ही स्कूटर दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह (१.९५ किलोवॅट तास आणि २.९ किलोवॅट तास) सादर केली आहे, ज्या लहान पॅकसह ८५ किमी आणि मोठ्या पॅकसह १३० किमी ड्रायव्हिंग रेंज देतात. कंपनीने बॅटरी AIS १५६ प्रमाणित असल्याचे सांगितले असून, पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ४.५ तास लागतात.












