जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । सणासुदीचे दिवस सुरु झाले असून दोन दिवसावर रक्षाबंधन सारखा सण येऊन ठेपला आहे. मात्र त्यापूर्वी जळगाव सुवर्णनगरीत सोने दराने ऐतिहासिक पातळी गाठली. जळगावमध्ये या आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. तर ऑगस्टच्या पाच दिवसांत २५७५ रुपयांनी महागले आहे. सोन्यापाठोपाठ चांदी दरात मोठी वाढ झाली.

काय आहेत आजचा सोने चांदीचा भाव?
बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोने दरात २०० रुपयाची वाढ होऊन १,०४,०३० रुपये तोळ्यावर स्थिरावले, हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांक दर ठरला आहे. दुसरीकडे चांदीतही २ हजारांनी वाढ होऊन १,१७,४२० रुपये किलो झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी आणखी ६०० रुपयांनी सोने महाग होऊन ते १,०३,८२४ रुपये तोळ्यावर पोहोचले आहे. तर बुधवारी २०० रुपयांच्या वाढीने दराचा विक्रम गाठला आहे. वाढलेले सोन्याचे दर हे सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरचे असल्याने ग्राहकांनी सोनेखरेदीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळतं आहे.
दरवाढीचे कारण?
रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिकेतील वाढता तणाव आणि भारतावर भरमसाट कर लादण्याची ट्रम्प यांच्या नव्या धमकीमुळे सोने चांदी दर वाढले दुसरीकडे सोन्याच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातील गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूक मानून सोने खरेदी करत आहेत. अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे कारण तेथील अलिकडच्या रोजगार अहवालात कमकुवतपणा आला आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा शेअर बाजारात जोखीम वाढते, अशा परिस्थितीत लोक सोन्यात पैसे गुंतवणे पसंत करतात. या आशेने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले, ज्यामुळे किंमती वाढल्या.
दिवाळीत सोने-चांदी नव्या उच्चांकावर?
दरम्यान सध्याच्या जागतिक तणावामुळे, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतातील सोने आणि चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर राहण्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या आसपास १ तोळा सोन्याचा दर १,१०,००० रुपये ते १,१२,००० रुपयांच्या दरम्यान राहण्याचाी शक्यता आहे. तर १ किलो चांदीचा दर १,२०,००० रुपये ते १,२५,००० रुपांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.












