जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. यातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स बस थेट नदीत कोसळल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा गावानजीक असलेल्या मोर नदीत घडली. या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू तर बस मधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींना नजिकच्या खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत असे की, इंदोर हून भुसावळ कडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स (एमपी 09- 9009) ही ही बस आमोदा गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरील पुलावरून जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही बस थेट नदीपात्रात कोसळली. ही घटना आज ६ जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेतील जखमींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमींना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. या संदर्भात फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.









