जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मोहन नगरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने मेहरूण तलावात आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. विनय अशोक देशमुख (वय २९, रा. मोहन नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह मृतदेह तलावात तरंगताना आढळला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनय देशमुख हा शहरातील एका झेरॉक्सच्या दुकानात तो कामाला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनय घरातून गेला. मात्र, तो दुकानात गेला नाही. विनय काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दिवसभर त्याने संपर्क न केल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली असता, त्याची दुचाकी मेहरूण तलाव परिसरात आढळून आली.

त्यामुळे विनयने आत्महत्या केल्याचा संशय अधिक गडद झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दिवसभर शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. अखेर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास विनयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह तत्काळ जीएमसी रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाने एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.









