जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी गावाजवळ जळगाव-चांदवड महामार्गावर भीषण अपघात झाला. ज्यात शेतासाठी खत घेऊन मोटारसायकलवरून निघालेल्या शेतकऱ्यांच्या दुचाकीला आयशरने जोरदार धडक दिली. त्यात एका शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. आबा जानराव-धनगर (वय ३५ वर्ष, रा. खडकी ता. चाळीसगाव) असं अपघातातील मृत तरुणाचं नाव असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केलं.

याबाबत असे की, खडकीमधील आबा धनगर हे शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, ते आज भगवान कोल्हे (वय २६ वर्ष) यांच्यासोबत शेतासाठी खत घेण्यासाठी मोटारसायकवर गेले होते. खत घेऊन परताना खडकी जवळील बायपास वर भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात आबा जानराव-धनगर हे ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेले भगवान कोल्हे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.आयशर वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर संतप्त खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून वाहनांची रांग लागलेली आहे. गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पूर्वीपासून प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला.पोलिसांनी रस्त्यावर तत्काळ गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.












