Jalgaon : रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री, लग्नही लावले ; जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे पित्याची आत्महत्या

जून 29, 2025 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२५ । जळगावमधील हरीविठ्ठल नगरातील एका प्रौढाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा धक्का आणि कोल्हापूर येथील आरोपींकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्रस्त झाल्याने या प्रौढाने आत्महत्याची बाब समोर आलीय. या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

image 55 jpg webp

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी रोजगाराचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेले. त्यानंतर तिला अडीच लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन कोल्हापूर येथील काही लोकांना विकून टाकले. इतकेच नव्हे तर, या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आणि या काळात ती पाच महिन्यांची गर्भवती देखील झाली. धक्कादायक म्हणजे, तिचा गर्भपातही करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकाराला कंटाळून अल्पवयीन मुलगी कशीबशी घरी पळून आली आणि तिने आपल्या कुटुंबाला आपबीती सांगितली.

मात्र मुलीला विकत घेणारे आणि तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण ‘मुलीला परत पाठवा, आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. एका बाजूला मुलीसोबत घडलेला अमानुष प्रकार, त्यात आरोपींकडून येणाऱ्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून मुलीच्या पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची विक्री आणि लग्न लावणे हे मोठे रॅकेट असून, या प्रकरणाचा सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now