जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२५ । जळगाव शहरात वर्षभरासह सहा महिण्यापुर्वी तयार झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडले. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी तातडीने महापालिकेत बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम आणि मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुमच्या चुकांमुळे आमच्यावर रोष व्यक्त होत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यांची होती उपस्थिती?
या बैठकीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त पंकज गोसावी, न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अहिरे, शहर अभियंता योगेश बोरोले, सहायक आयुक्त गणेश चाटे, उदय पाटील, रचना सहायक समीर बोरोले, अतुल पाटील, विजय मराठे, शिरसाठ उपस्थित होते.

आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधी आणला. शहरातील बहुतांश ठिकाणी रस्ते झाले. मात्र शहरात एक वर्ष व सहा महिने झालेल्या प्रमुख रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडले. याबाबत आमदार भोळे यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अहिरे यांनी काव्यरत्नावली चौकात रस्ताच झालेला नसल्याचे उत्तर दिले. शहरातील अन्य रस्त्यांकडे लक्ष वेधल्यावर मात्र त्यांची बोलती बंद झाली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, मक्तेदारावर कारवाई करा, कोणालाच पाठीशी घालू नका, महापालिकेनेही तरतूद करावी आणि त्यांच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा सूचना आमदार भोळे यांनी दिल्या. त्यावर शहर अभियंता योगेश बोरोले यांनी आपल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान महापालिकेच्या पॅनलवरील वकील महापालिकेचे हित बघत नसतील आणि सातत्य केसेस हरत असतील तर हे वकील तात्काळ बदल करा.. हा जनतेचा पैसा आहे, अशा शब्दात आमदार भोळे यांनी यंत्रणेवर संताप व्यक्त केला त्यांची वकील बदलविण्याच सूचना आयुक्तांनी मान्य केली.
तीन नवीन पूल होणार
गिरणा नदीवरील पुलावरून सतत वाहतूक सुरू असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करता येत नाही. बायपास सुरू झाल्यावर ऑगस्ट महिन्यात हे ऑडिट केले जाईल, असे न्हाईचे संचालक शिवाजी पवार यांनी सांगितले. खोटे नगर, मास्टर कॉलनी व खेडी नजीक गौरव हॉटेलजवळ पूल उभारला जाणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली. यासाठी निधी आणू, असे ते म्हणाले.
इमारतीतील पार्किंगवरूनही आमदार भोळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
दरम्यान, यावेळी आमदार भोळे यांनी इमारतीतील पार्किंगवरूनही नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. इमारतींमध्ये दुचाकी, चारचाकी पार्किंग बंधनकारक असताना सुध्दा रिंगरोडच्या काही इमारतींमध्ये केवळ दुचाकींच्या पार्किंगच करण्यात आल्या आहे. सर्वसामान्य नागरिकाचे घर असेल तर नगररचना विभागाला कागदपत्र ओके हवे असते. पण रिंगरोडवर काही पाच मजली इमारतीत पार्किंग केवळ दुचाकीपुरती आहे. अनधिकृत अतिक्रमण सुध्दा असून ते का तपासले जात नाही असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. अखेर आयुक्तांनी तातडीने तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.











