जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२५ । एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथून एक अत्यंत दुखत घटना समोर आलीय. नववधू लक्ष्मी मुकेश जगताप (२०) हिचा ४ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. मात्र लग्नाची हळद फिटण्याआधी म्हणजे लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.घरात लक्ष्मीच्या रूपाने येणारी ही लक्ष्मी तीनच दिवसांत जग सोडून गेली आणि लग्नघरात आनंदाच्या ठिकाणी शोक पसरला.

भातखेडे येथील माणिक रामदास जगताप यांचा मुलगा मुकेश जगताप (२६) हा खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचा विवाह सुरत येथील स्व. विजय भगवान ठाकरे यांची कन्या लक्ष्मी हिच्याशी ठरला. लक्ष्मीला वडील नसल्याने गरिबाघरची मुलगी जगताप परिवाराने पसंद केली. लग्नाची तारीख ठरली. त्याप्रमाणे लक्ष्मीची आई मीनाबाई आणि नातेवाईक ११ मे रोजी भातखेडे येथे पोहोचले. १२ रोजी मेंदी, १३ रोजी हळद आणि मिरवणूक अशा पारंपरिक सोहळ्यांचे आयोजन उत्साहात झाले. १४ मे रोजी दुपारी अचानक चक्कर येऊन लक्ष्मी खाली कोसळली. त्यावेळी गावातील डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार करण्यात आले आणि लग्न समारंभ पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी लक्ष्मीची प्रकृती बिघडल्याने तिला एरंडोल व नंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

तपासणीनंतर लक्ष्मीला न्यूमोनिया आणि कावीळ असल्याने निदान झाले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. शनिवारी १७ मे रोजी पहाटे पाच वाजता तिचा मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाइकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना शोक पसरला. लक्ष्मीला वडील आणि भाऊ नाहीत. आई आणि दोन बहिणी असा तिचा परिवार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. लग्नासाठी सर्व खर्च वरपित्याने केला होता. शनिवारी सायंकाळी भातखेडे येथेच लक्ष्मीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाही. लक्ष्मी आणि मुकेशने एकत्र आयुष्याची स्वप्ने रंगवली होती; पण नियतीच्या क्रूर खेळाने ती अपूर्णच राहिली.












