जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जून २०२१ । पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी काल महावितरण विरोधात ताळाठोको आंदोलन केले त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी संदर्भात स्वतःहा सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. याचा समाचार घेत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार किशोर पाटील फक्त नौटंकीबाज माणूस असून त्यांनी आता हा नौटंकीबाजपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, राज्यात सत्ता त्यांची आहे. मुख्यमंत्री त्यांचे पक्षाचे आहेत ऊर्जामंत्री यांच्या महा विकास आघाडीचे आहेत ते स्वतः आमदार आहेत.हे ते विसरून गेले आहेत का ? जर त्यांना खरच शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आहे. तर त्यांनी मुख्यमंत्री अथवा ऊर्जामंत्र्यांकडून तसा आदेश आणुन शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, पण ते फक्त आंदोलनाची नौटंकी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच जनतेने नाकारलेल्या नेतृत्वाची पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याने उसने अवसान आणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता, तसेच जिल्हा पक्ष संघटनेत विनवण्याकरून सुद्धा आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले गेले नाही. म्हणुन शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून स्वतःच्या सरकार विरोधात आंदोलन करून पक्षश्रेष्टीचे लक्ष वेधून घेण्याचा केवीलवाणा प्रयन्त आमदारांकडून केला जात आहे. परंतु शेतकरी बांधव यांचा नाटकीपणा चांगलेच ओळखून आहेत.त्यामुळे आंदोलनाला कार्यकर्त्यांपेक्षा पोलीसांचीच संख्या जास्त होती, आणि ह्या महाशयांनी स्वतःला अटक झाल्याचे दाखवुन पोलीस स्टेशनला जाऊन अधिकाऱ्यांच्या दालनात ए.सी.मध्ये बसुन चहापान केला याला कुठली अटक म्हणायची हा तर फक्त नाटकीपणा आहे.
तसेच मागील काळात ऐन रब्बी हंगामात कृषी पंपाचे ट्रांसफार्मर मोठ्या प्रमाणात खराब होत होते ते दुरुस्ती साठी लागणारे ऑइल व इतर सामग्री अभावी ट्रांसफार्मर महिना-महिनाभर दुरुस्त करून मिळत नव्हते,त्यातच ह्या जुलमी ठाकरे सरकारने थकीत वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन व त्यासोबतच लोक डॉन मुळे वीजबिल न भरू शकलेले घरगुती वीज कनेक्शन देखील तोडण्याचा आदेश काढला आणि वीजबील भरत नाही तोवर कनेक्शन जोडणी होणार नाही. असा सज्जड दम महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या वेळी शेतकऱ्यांना दिला होता.अशा या बिकट परिस्थितीत तालुक्यांतील शेतकरी पूर्णपणे होरपळुन गेले असताना भारतीय जनता पार्टीने महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांची वेळोवेळी संपर्क करून तसेच निवेदने देऊन हा विषय मार्गी लावला होता. त्यावेळी हे नौटंकी बाज आमदार महोदय कुठेच दिसले नाहीत.असे शिंदे यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यापूर्वी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून सुमारे ज्वारीसाठी 2000, मक्यासाठी 1300 व गहूसाठी 20 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आज पावेतो शेतकऱ्यांचा माल खरेदी केला गेलेला नाही. ऐन खरिपाचा हंगाम डोक्यावर आलेला असताना शेतकऱ्यांकडे बी बियाणे व रासायनिक खतांसाठी पैसा उपलब्ध नाही,शेतमाल खरेदीसाठी नाव नोंदणी केलेला शेतकीसंघाकडून आपला माल खरेदी केला जाईल, या आशेने बसला असून यावर महाशय आमदार शासन स्तरावर आवाज का उठवत नाहीत. तसेच मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये जिल्हा दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी उलट दुधाचे भाव कमी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले गेले राज्याबाहेरील अमूल सारखी कंपनी आपल्या तालुक्यांमधून चढ्या भावाने दूध खरेदी करत होती. परंतु आमदार महोदय हे जिल्हा दूध संघाचे संचालक असताना देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जनतेने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यांना आमदार बनवले आहे पण यावरून तरी एकच सिद्ध होते कि हे शेतकरी हिताचे नाही तर शेतकरी विरोधी आमदार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाचोरा आणि भडगाव तालुक्यात रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत होती.त्यामुळे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी दोन रुग्ण दगावले परंतु आमदारांनी याबाबतीत आज पावेतो कुठलीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच आमदारांनी पाचोरा आणि भडगाव येथे स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट साठी मोठा गाजावाजा करून जागेची पहाणी करून सांगितले होते की येणाऱ्या पंधरा दिवसात ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित होईल, परंतु दीड महिना होऊन गेला तरीही ऑक्सीजन प्लांट हा फक्त कागदावरच आहे.कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता ऑक्सीजनसह सर्व यंत्रणेचे नियोजन असणे गरजेचे आहे. परंतु अश्या कुठल्याही पद्धतीचे नियोजन दिसून येत नाही. असे दृष्टिहीन व नियोजन शून्य नेतृत्व पाचोरा आणि भडगाव तालुक्याला लाभले असून त्यांच्याकडून लोकांच्या समस्या सोडवल्या जात नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे या प्रसंगी म्हटले.यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य मधुकर काटे,तालुका सरचिटनिस गोविंद शेलार,विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, संजय पाटील, दिपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/318737589735747/