Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जमा होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयाचा लाभ मिळत आहे. जुलै २०२४ महिन्यापासून लाभ देण्यास सुरुवात झाली. जुलै ते डिसेंबरपर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला असून यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होईल याकडे महिलांचे लक्ष लागले.
मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता जानेवारीचे १५ दिवस उलटून गेले आणि मकरसंक्रांतदेखील उलटून गेली; परंतु अजूनही पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झाले नाहीत म्हणून महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे,’ अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या की, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ देण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात २६ जानेवारीपर्यंत जमा केला जाणार आहे. त्यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. याच निधीतून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरीत केली जाईल.लाभार्थी महिलांना वेळेवर हप्ता देणे हे प्राधान्य आहे, असंही त्यांनी सांगितले.