जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । राज्यभरातील प्रवासी लवकरच महागाईचा सामना करणार आहेत. रिक्षा, टॅक्सी आणि एसटी बसच्या तिकीट दरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावावर येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच परिवहन विभागाचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी, रिक्षा, शहरातील बससेवेच्या तिकीटदरांसंदर्भात निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे बसच्या तिकीट दरामध्ये १ ते ५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात ३ ते ४ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १५ जानेवारीला म्हणजे बुधवारी होणाऱ्या बैठकीत या भाडेवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता आहे
ही वाढ इंधनाच्या वाढत्या दरामुळे आवश्यक झाली आहे, ज्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटना, एसटी महामंडळ आणि ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर या शहरांतील परिवहन विभाग गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढीची मागणी करत आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली होती. त्यावेळी रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या २ वर्षांत प्रवासी भाड्यात वाढ झालेली नाही म्हणून रिक्षाचालक संघटनांनी पुन्हा भाडेवाढीसाठी सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, अशी संघटनांची मागणी आहे.