मंगळ ग्रह दोष निवारणासाठी विवाहापूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय अमळनेरमध्ये येणार असल्याची अफवा पसरली होती. यानंतर देशभरात अमळनेरमधील जागृत मंगळग्रह देवस्थान चर्चेत आले. अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात स्वतंत्रपणे श्री मंगळदेव ग्रहाची मंदिरे अत्यंत दुर्मिळ आहेत.
जळगाव जिल्ह्यात फिरतांना तुम्हाला अनेक चारचाकी गाड्यांमागे या मंदिराचे स्टिकर सापडतील. येथे येणाऱ्या प्रत्येक गाडीवर या मंदिराचे एक स्टिकर लावण्यात येते. गेल्या काही वर्षात लग्न होत नाहीये म्हणून येथे पूजा करायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक गाड्यांवर या मंदिराचे स्टिकर तुम्हाला सर्रास आढळून येतात.
अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर कोणी बांधले ? मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. १९९३ मध्ये या मंदिराचा दगडूशेठ सराफ यांनी जीर्णोध्दार केल्याचे सांगितले जाते. सराफ यांनी १९४० पर्यंत मंदिरातील सर्व पूजा, विधी नियमित करीत मंदिराचा परिसर विकसित केला. त्यांच्या निधनानंतर हे मंदिर पुन्हा दुर्लक्षित झाले. त्यामुळे काही दिवसातच त्यास भग्नावस्था प्राप्त झाली. त्यानंतर जवळपास १२ वर्ष एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणारे जगदीश नाथजी महाराजांनी या मंदिराला गतवैभव मिळवून दिले.
परंतु, काही काळानंतर नाथजी महाराज अचानक मंदिर सोडून निघून गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर बराच काळ मंदिर दुर्लक्षित राहिले. १९९९ पर्यंत मंदिर परिसर नगरपालिकेचा कचरा डेपो झाला होता. त्यामुळे हे मंदिर गुन्हेगारांच्या लपण्याची आणि गांजा पिणाऱ्यांची जागा म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. असे देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. १९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरीत्या कायापालट झाला आहे.
अमळनेर येथे दर मंगळवारी अभिषेक व मंगळ शांतीसाठी होम हवन होतात. येथे भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था आहे. येथे मंगळवारी महाप्रसाद असतो. कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, पुरी व गुळाचा शिरा आसा प्रसाद आवघ्या १५ रुपयात दिला जातो.
मंगळग्रह मंदिर अमळनेर येते कसे जायचे?
अमळनेर जळगावपासून सुमारे ६० किलोमीटरवर आहे. जळगावहून सकाळी नऊच्या सुमारास भुसावळ-सुरत पॅसेंजर व नवजीवन एक्सप्रेस आहेत. जळगाव बस स्थानकावरूनही अनेक बसआहेत. धुळे शहरापासून अमळनेर ३६ किलोमीटरवर असून तेथून बस व खाजगी वाहनांचे अनेक पर्याय आहेत.