जळगावकर रंगकर्मींतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस उत्साहात साजरा
बालगंधर्व नाट्यगृहात अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । मराठी थिएटर अर्थात ‘मराठी रंगभूमी’ला समृद्ध वारसा आहे. मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदल यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेच्या आयोजनात आज (दि.५) जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, अरुण सानप यांच्याहस्ते माल्यार्पण करुन नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले. त्यानंतर बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. अमोल ठाकूर, सचिन महाजन, दर्शन गुजराथी, मोहित पाटील यांच्यासह कलावंतांनी गण व नांदी म्हटली.
याप्रसंगी शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.शमा सराफ, कार्यकारिणी सदस्य सुबोध सराफ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सोशल मिडीया प्रमुख मोहित पाटील आदींसह रंगकर्मी चिंतामण पाटील, अरुण सानप, जगदीश नेवे, सुहास दुसाने, अविनाश चव्हाण, दर्शन गुजराथी, मानसी नेवे, यश चौधरी, गायत्री ठाकूर, विशाखा सपकाळे, वैभव बाविस्कर आदी उपस्थित होते.
का साजरा केला जातो मराठी रंगभूमी दिवस?
१८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.