जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । जळगावकरांसाठी एक धक्कादायक बाब समोर आलीय. दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या प्रदूषित यादीत जळगाव शहर महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे. एकीकडे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जाते पण, दुसरीकडे जळगाव शहरात सर्वाधिक फटाके फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव शहरातील दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीने होणारे प्रदूषण हे महाराष्ट्रात सर्वाधिक ठरले आहे. ३० ऑक्टोबर ते २ डिसेंबर या काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०१ ते २७९च्या दरम्यान राहिल्याची नोंद झाली. या चारही दिवस जळगावकरांना दूषित हवा मिळाली आहे. ही हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे.
यंदा दिवाळीसह निवडणुकीची धामधूम सध्या शहरात आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा जादा फटाक्यांची विक्री झाली. गतवर्षी कोटींवर फटाक्यांची उलाढाल झाली होती, यंदा ती चार कोटींवर पोहोचली. जळगावकरांनी दिवाळीचा आनंद ३० ऑक्टोबरपासूनच लुटण्याला सुरूवात केली. अर्थात या तारखेपासूनच काही फटाके फोडायला सुरूवात केली.
यातच दिवाळीच्या काळात सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडायला परवानगी होती. मात्र, या आदेशाला शहरवासीयांनी केराची टोपली दाखवून १२ वाजेपर्यंत फटाके फोडण्याचा आनंद लुटला. परिणामी, ३० ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत शहरात धूर पसरून हवा प्रदूषित झाली. या चारही दिवशी एकीकडे फटाके फोडण्याचा आनंद जळगावकरांना तर मिळाला पण अशुध्द हवा सुद्धा मिळाली. यातच आता हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाच्या नोंदीनुसार जळगाव शहर हे महाराष्ट्रात प्रदूषणात अव्वल ठरले आहे.