जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । पुण्यात हिट अँड रनचे आणखी एक प्रकरण समोर आले असून एका भरधाव कारने दुचाकीवरील दोन पोलिसांना उडवले. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वढोदा येथील रहिवाशी असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. समाधान कोळी असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर पी. सी. शिंदे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पण पोलिसांनी त्याला नंतर अटक केली. सिद्धार्थ केंगार असे या कार चालकाचे नाव आहे. अपघातावेळी कार चालक मद्यधुंद असल्याचा संशय असून पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. कार चालक केंगार हा मेकॅनिक असून त्याच्या मित्राने सव्र्व्हिसिंगसाठी आलेली कार त्याला दिली होती.
ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली सोमवारी रात्री साधारणतः पावणे दोन वाजता घडली. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कार (क्र. एमएच १४- केजे ९२५८) चालकाने त्यांना जोरात धडक दिली.
यात मागे बसलेले खड़की पोलिस ठाण्याचे हवालदार समाधान कोळी यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले तर दुचाकी चालक बीट मार्शल संजोग शिंदे गंभीर जखमी झाले. मृत समाधान कोळी हे मूळचे चोपडा तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी आहेत. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पसार झालेल्या वाहनचालकाचा तपास करीत त्याला अटक केली. आरोपी सिद्धार्थ केंगार (राहणार – बोपोडी, पुणे) याने दारूच्या नशेत वाहन चालवण्याचा पोलिसांना संशय असून त्याची खातरजमा करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. याबाबत खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर म्हणाले, आरोपीने मद्य प्राशन केले होते की नाही याबाबत त्याच्या रक्ताचा नमुन्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.