जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । महाराष्ट्रात जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. जळगावातही मागील काही दिवसापासून पावसाच्या सरी बरसत आहे. मान्सून सक्रिय झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट ?
हवामान खात्याने आज राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
गेल्या ७२ तासांमध्ये घाट माथ्यावर अतिवृष्टी होत असून, कोकण, घाट माथा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ७२ तासांत दरडप्रवण क्षेत्रामध्ये प्रचंड पावसाची नोंद झाली.
दरम्यान अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी, नवी मुंबई शहरासह ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व माध्यमांच्या शाळा आज बंद राहणार आहेत.