⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी

ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । पांढऱ्या रंगाचा पोषाख, डोक्यावर टोपी, कपाळी अष्टगंध व बुक्का, गळ्यात तुळशीमाळा धारण करून, मुखात अखंड ‘रामकृष्णहरी’ मंत्राचा जप व हरिनामाचा उच्चार करीत, टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या साहाय्याने नामाचा गजर करीत, हरिनामाचा झेंडा उंचावत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३००० वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे ५५ बसेसमधून मार्गक्रमित झाले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदारसंघातील ज्येष्ठांना ही आषाढीची वारी घडविण्यात येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव ग्रामीण मतदार संघातील तीन हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांसाठी आषाढी वारीनिमित्त पंढरपूर जाण्यासाठी ५४ मोफत बसेस, खाजगी वाहनासह भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ना. गुलाबराव पाटील व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या बसेसला हिरवा झेंडी दाखविण्यात आली.

कीर्तनकारांच्या पहिल्या बसमधे काही अंतर उभ्याने प्रवास करून ना. गुलाबराव पाटील यांनी वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या. भरपूर पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाला केली. मी दरवर्षी आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेत असतो. पांडुरंगाच्याच कृपाप्रसादाने आज ५४ बसेसद्वारे जिल्ह्यातील वारकर्‍यांची वारीची व विठ्ठलदर्शनाची व्यवस्था करता आली हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकरी, कीर्तनकार व भाविक भक्तांशी संवाद साधतांना केले.

गुलाबराव पाटील, प्रताप पाटील वारकऱ्यांच्या रंगात रंगले
वारकऱ्यांना रवाना करण्यापूर्वी गुलाबराव पाटील भक्ती रंगात रंगले. त्यांनी कीर्तनकारांसोबत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांसोबत चक्क फुगडी देखील खेळली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील देखील भक्तीरसात तल्लीन झाल्याचे दिसून आले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हा प्रमुख सरिता कोल्हे – माळी उपजिल्हाप्रमुख पी.एम पाटील, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पायलट बसमध्ये कीर्तनकार
या बस वारीचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जीपीएस मित्र परिवार यांनी केले असून प्रत्येक वारकर्‍याचा विमा घेण्यात आला आहे. बस वारीत पायलट बस कीर्तनकार महाराजांसाठी सजवण्यात आली होती. तिचे नेतृत्व श्रीगुरु मोठेबाबा वारकरी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोप्रेमी हभप गजानन महाराज यांचे सह ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प. प्रा.चत्रभूज महाराज, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई जवखेडेकर, ह.भ.प. कैलास महाराज कोंढावळकर, ह.भ.प. ईश्वरलालजी महाराज यांचेसह जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.