जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । यावल तालुक्यातील सावखेडा सिम या ठिकाणी कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत तपास केला असता,अनिल प्रकाश पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यावर अडीच लाखापर्यंत चे कर्ज होते, तो कर्जबाजारीमुळे काही दिवसांपासून त्रस्त देखील दिसून येत होते. ह्याच कर्जबाजारीपणाला त्रस्त होऊन २ जून पासून घरात कोणालाही न सांगता ते निघून गेले होते.
त्यानंतर काही दिवसांनी कादर मोहम्मद तडवी हे त्यांच्या शेतात, अनेक दिवसांपासून बंद असलेले विजपंप सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांना जवळील विहिरीतून दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत डोकावून बघितल्यानंतर अनिल पाटील यांचा मृतदेह आढळून आला. ही खबर त्यांनी लगेचच पोलीस पाटील, पंकज बडगुजर यांना दिली असता, त्यांनी यावल पोलीस ठाण्यात कळवले.
मृत अनिल पाटील यांच्या कुटुंबात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, आई राहत होते. या दुर्घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
यावल पोलिसांनी त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.डॉ. प्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावर पोलिसात खबर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार, वसीम तडवी आणि सहकारी करीत आहेत.