मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला! आज कुठे बरसणार पाऊस, जळगावात काय आहे पावसाची स्थिती?

जून 11, 2024 2:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी रात्री उशिरापर्यंत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबई पुण्यासह तो आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहचला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या ४८ तासांतील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. जळगावला पावसाचा अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

11JuneRain jpg webp

मान्सून दाखल होण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे एप्रिल-मे महिन्यात उष्णतेने हैराण झालेल्या जळगावकरांना जूनच्या सुरुवातीलाच दिलासा मिळाला आहे. रविवारी नंतर मध्यरात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज मंगळवार जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून सायंकाळी किंवा रात्री पावसाच्या सरी कोसळू शकतात.

जळगांव जिल्हा 11/ 6/2024
बोदवड-18
भडगाव-50
भुसावळ-0.4
जामनेर-75
चोपडा-22
चाळीसगाव-0
रावेर-2
मुक्ताईनगर-4
धरणगाव-29
यावल-12.3
एरंडोल-46
जळगाव-75

दरम्यान जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झालेला असून मान्सूनची सध्याची हालचाल बघता तो येत्या दोन तीन दिवसातजळगावात दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी पूर्ण केली असून, शेत पेरणी योग्य करून ठेवले आहे. ७ जूनला मृग नक्षत्राचा पाऊस येतो. मात्र, तो अत्यल्प प्रमाणात झाला. पेरणीसाठी दमदार पाऊस लागतो. तो अद्याप झालेला नाही. यामुळे शेतकरी दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी
आज मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now