जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । पाणीपुरीचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी खायला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळचं असेल. मात्र हीच पाणीपुरी खाणं लोकांना फार महागात पडलं आहे. आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला. दरम्यान रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने घटनेचा उलगडा झाला. त्यांच्यावर नजीकच्या अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे काल आठवडे बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. अनेकांनी यावेळी बाजारात उघड्यावर विक्री होत असलेल्या पाणी पुरीचा आस्वाद घेतला. तर काहींनी घरी खायला पार्सल नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला. अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं समजतय. आतापर्यंत जवळपास ८० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यानंतर ७० पैकी ३० रुग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेचे आमदार लता सोनवणे यांनी तातडीने रुग्णालय गाठले आणि रुग्णांची विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या.