⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पद्मालय येथे अंगारकीला दिवसभरात ७० हजार भाविकांनी घेतले दर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जवळपास ६० ते ७० हजार भाविकांनी श्री क्षेत्र पद्मालय येथे हजेरी लावून श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख ठेवण्यात आला होता. भल्या पहाटे जळगावचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी देवालय खुले करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिर शासनाच्या आदेशानुसार भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे मंगळवार दि.२३ रोजी, अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र पद्मालय येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वप्रथम जळगावचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी ऍड. आनंदराव पाटील व डॉ. पिंगळे यांच्या हस्ते नितीन लढ्ढा यांचे स्वागत करण्यात आले. अंगारकीनिमित्त भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून विश्वस्त ए.एल. पाटील, भाऊसाहेब कोळी, भिका महाजन व इतर विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांची रांग लावण्यासाठी दर्शन बारी उभारण्यात आली होती तसेच अभिषेकसाठी मंडप उभारण्यात आला होता. नेहमीप्रमाणे डॉ. पिंगळे यांनी विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. तळई प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे याठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पारोळा सहाय्यक निरीक्षक गायकवाड, सुदर्शन दातीर यांच्यासह ७० पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.