जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नगर परिषदेच्या स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. उत्कर्ष गणेश पाटील असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

नेमकं काय घडलं?
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने उत्कर्ष हा त्याचे वडील गणेश पाटील यांच्यासोबत प्रथमच जामनेर नगर परिषदेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर वडिलांनी उत्कर्षला स्विमिंग पूलच्या काठावर उभे करून फोटोसेशन केले. त्यानंतर वडील ओले कपडे बदलण्यासाठी जवळच असलेल्या चेंजिंग रूममध्ये गेले. त्याच दरम्यान, उत्कर्ष काही वेळ तिथेच थांबला होता. खेळता खेळता तो स्विमिंग पूलच्या आऊटलेटसाठी तयार करण्यात आलेल्या खोल चेंबरजवळ गेला आणि त्यात पडला.

काही मिनिटांतच वडील गणेश पाटील कपडे बदलून बाहेर आले, तेव्हा त्यांना मुलगा उत्कर्ष त्या ठिकाणी दिसला नाही. त्यांनी तातडीने त्याची शोधाशोध सुरू केली. सुट्टीचा दिवस असल्याने तिथे गर्दी होती, त्यामुळे उपस्थित नागरिकांनीही मुलाचा शोध घेण्यास मदत केली. अखेर सर्वांचे लक्ष पाण्याच्या आऊटलेट चेंबरकडे गेले असता, उत्कर्ष चेंबरच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दीड वर्षात जामनेर नगर परिषदेच्या या स्विमिंग पूलमध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. आऊटलेटसाठी बनवलेल्या एवढ्या महत्त्वाच्या चेंबरवर सुरक्षित झाकण का नव्हते? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पुरेशा सुरक्षेअभावी एका निष्पाप चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.









