⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण झाली…

काळाच्या ओघात अनेक गोष्टी, माणसं बदलतात हे कितीही खरं असलं तरीही याला काही अपवादही आहेत. या अपवादांपैकीच एक म्हणजे काही कलाकृती. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादानं संपन्न अशाच कलाकृतींपैकी एक असणाऱ्या ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट. आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला.

लेखक वसंत सबनीस आणि सचिन पिळगावकर सर दोघे जण व्ही.शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम यांना भेटले आणि त्यांनी बिवी और मकान चा रीमेक बनवायची इच्छा व्यक्त केली. किरणजींकडे त्यावेळी व्ही.शांताराम प्रॉडक्शनच्या युवा विभागाची जबाबदारी होती. किरणजींना रिमेक करणं आवडत नसायचं. पण कथानक आणि एकंदरित संवाद एवढे भन्नाट होते की त्यांना नकार देता आला नाही. कथानकाचं पोटेंशिअल किरणजींनी तेंव्हाच ओळखलं होतं. कथानक त्यांनी तीन-चार वेळा वाचुन काढलं. प्रॉडक्शनच्या टिमला पण कथानक प्रचंड आवडलं. बजेट पास झालं आणि व्ही. शांताराम प्रॉडक्शन्सच्या युवा विभागाअंतर्गत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. २३ सप्टेंबर १९८८ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. १९८८ साली सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटाची नोंद झाली.

कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच. कारण आजही या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आम्हाला तोंडपाठ आहे, असं अभिमानानं सांगणाऱ्यांचा आकडा आश्चर्यचकित करुन जातो. चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही.

मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठी ही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या पिढीने देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.बनवाबनवी चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहे. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट ‘बिवी और मकान’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे. तुम्हाला ही गोष्ट वाचल्यानंतर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट एका बॉलिवूड चित्रपटावरून बनवण्यात आला आहे.

बीवी और मकान हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात कॉमेडीचा बादशहा मेहमूद मुख्य भूमिकेत होता. तसे विश्वजीत, कल्पना, शबनम, पद्मा यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. चुपके चुपके, खुबसुरत यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या हृषिकेष मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर हेमंत कुमार या चित्रपटाचे निर्माते होते. बीवी और मकान या चित्रपटाची कथा आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटाची कथा अगदीच सारखी आहे.
मात्र मराठी प्रेक्षकांना अशी ही बनवाबनवी जवळचा वाटला तो त्यातील संवादातून, अशी ही बनवाबनवीमधील गाजलेले संवाद आजही अगदी आजच्या पिढीच्या तोंडावरदेखील असतात. यातील एक संवाद म्हणजे धनंजय माने इथेच राहतात का?, या संवादांचे अनेक मीम्स्‌देखील सोशल मिडीयावर फिरतांना आजही आढळून येतात. लिंबाचं लोणचं म्हटलं की, माझ्या तोंडाला नळासारखी धार लागते. लिंबाचं लोणचं… लिंबाचं सरबत ..लिंबाचं मटन, तुमचे सत्तर रुपये वारले, आणि हा माझा बायको, आमच्या शेजारी राहते नवऱ्यानं टाकलं तिला.

ह्या चित्रपटात अगदी लहानात लहान रोलसाठी सुद्धा अजिबात तडजोड केली गेली नाही त्यामुळे अगदी पाच मिनिटांच्या रोलसाठी सुद्धा अतिशय चांगले अभिनेते घेण्यात आले होते. सचिनच्या काकांचे काम केलेले कलाकार सुहास भालेकर ह्यांचा पूर्ण चित्रपटात फक्त एकच सीन आहे तरीही आपल्याला त्याच्या आवाजातले “ तुला जग मोकळ आहे ” हा डायलॉग विसरता येत नाही. कमळीचे बाबा झालेले जयराम कुलकर्णीसुद्धा अगदी कमी वेळासाठी ह्यात आहेत मात्र त्यांची भूमिका सुद्धा आपल्या लक्षात राहते. अत्यंत कजाग मालकीणबाईच्या रुपात अश्विनी भावे सुद्धा फार भाव खावून जातात. त्यांचा हळूहळू बदलत जाणारा स्वभाव बघताना फार मजा येते.

सतत ओरडण्यापासून ते अशोक सराफ ह्यांच्या प्रेमात पडण्यापर्यन्तचा प्रवास अत्यंत सुंदर आहे. सगळ्यात जास्त मजा आणतात ते मिस्टर सरपोतदार ही भूमिका करणारे सुधीर जोशी, अत्यंत खडूस पुणेरी घरमालक त्यांनी अगदी अचूक रंगवला आहे. अगदी सुरवातीला शंतनुला ती पाटी आम्ही फाटकाची शोभा वाढवण्यासाठी लावलेली नाही म्हणणे असो किंवा आनंदी आनंद गडे म्हणत केलेला विचित्र नाच असो, सुधीर जोशी अगदी प्रत्येक प्रसंगात तंतोतंत खडूस घरमालक दिसतात. त्यांची आणि अशोक सराफ ह्यांची जुगलबंदी हा ह्या चित्रपटाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. “ तुमचे सत्तर रुपये वारले ” म्हणणारा अशोक सराफ असो किंवा मला रोज सकाळी दोन कप चहा लागतो म्हणणारा असो, समोरून सुधीर जोशी त्यावर असे काही हावभाव देतात की तो प्रसंग आपण कधी विसरूच शकत नाही. फक्त पंधरा ते वीस मिनिट चित्रपटात असूनसुद्धा इतक लक्षात राहणार काम करणे फार कठीण असते.

ह्या चित्रपटातील अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेची स्त्री भूमिका. सचिन पिळगावकर स्त्री भूमिकेत शोभून दिसतात मात्र रांगडे दिसणारे लक्ष्मीकांत बेर्डे कुठल्याच क्षणी स्त्री रुपात शोभून दिसत नाहीत आणि तरी त्यातून ते चित्रपटात गम्मत आणतात. त्यामुळे जेव्हा अशोक सराफ हा माझा बायको पार्वती किंवा मला ह्या रान रेड्याशी संसार करावा लागतोय असे डायलॉग म्हणतात तेव्हा आपल्याला हसू अडवण कठीण होऊन जात. लक्ष्मीकांत बेर्डे ह्याचं टायमिंग तर आपल्याला चित्रपटभर नुसत हसवत सुटत. परत परत त्याच झाडावर काय, ठाक ठाक, धनंजय माने इथेच रहातात काय? हे संवाद आजही नुसते आठवले तरी आपल्याला नकळत हसू येतं.

विजु खोटेच्या बळी ह्या पात्राची वेशभुषा कॉमिक बुक्समध्ये असलेल्या चोरासारखी आहे. गडद रंगाची पँट, काळ्यापांढऱ्या लाईन्सचा टिशर्ट, गळ्यात बांधलेला टपोरी स्टाईल फिकट रंगाचा रुमाल, गालावर असलेली मस. हे पुर्णतः कॉमिक बुकमध्ये असलेल्या चोर दरोडेखोराच्या वेशभुषेशी तंतोतंत साधर्म्य असणारं आहे. सबंध चित्रपटात तो फक्त दोन वेळा टि-शर्ट बदलतो. पण त्याच्या टि-शर्टचा पॅटर्न एकसारखाच आहे. अजुन अशी बरीच पात्रं आहेत.

अप्रतिम संवाद ही ह्या चित्रपटाची एक अजून महत्वाची बाजू आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्ष झाली तरीही अजूनसुद्धा ह्यातले खुसखुशीत संवाद आपल्याला हसवतात. जाऊबाई – नका बाई जाऊ एवढ्यात, आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत, लिम्बाच मटन, आणि ह्या मिसेस बालगंधर्व असे कितीतरी संवाद नुसते आठवले तरी आपण हसायला लागतो. असा हा एक अप्रतिम असा मराठी चित्रपट आहे.

ह्या उदाहरणातून आपल्याला एवढाच लक्षात येत की चित्रपट हा अनेक वेगवेगळ्या रसायनांचा मिळून बनत असतो. नुसती कथाच नाही तर अभिनय, संवाद, गाणी, दिग्दर्शन ह्या सगळ्यांचे तेवढेच महत्व असते. मराठीतल्या ढिगभर कॉमेडी चित्रपटांच्या भाऊगर्दीत अशी ही बनवाबनवी पहिल्या क्रमांकावर आहे. खुप सारे कॉमेडी चित्रपट मराठीत बनतील पण बनवाबनवी हा एकमेवाद्वितीय आहे.

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)