जळगाव लाईव्ह न्यूज। २५ जुलै २०२३। जळगाव जिल्ह्यासाठी पुरवणी बजेटअंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील आमदारांच्या पाठपुरवठ्यामुळे १३६ कामांसाठी एकूण ३२१ कोटी ५ लाख ४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. शासकीय इमारत बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग व त्यावरील पुलांसाठी निधीचा समावेश आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १३६ रस्त्यांच्या विकासासाठी बजेट व ‘नाबार्ड’मधून एकूण ३२१ कोटी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात भुसावळ विभागात ३० पूल व रस्त्यांची कामे होतील.उत्तर विभागातील ६५ पूल व रस्त्यांची कामे, जळगाव क्रमांक दोन विभागातील १५ पूल व रस्त्यांची कामे तर अमळनेर विभागातील २६ कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.
९ मार्चला राज्याचे बजेट सादर झाले होते. त्यात जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या तब्बल ४४५ पूल व रस्त्यांच्या कामांसाठी ९३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता. यातील बहुतांश कामांना वर्कऑर्डर दिल्या असून, कामे प्रगतिपथावर आहेत. अनेक कामांचे टेंडर झाले. पुरवणी बजेटमध्ये पुन्हा १७ जुलैला शासनाने ३२१ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. जिल्हा विकासासाठी या वर्षी मार्च व जुलैमध्ये मंजूर झालेल्या एकूण एक हजार २५२ कोटींचा निधी मंजूर झाल्याने रस्ते विकासासाठी दिलासा मिळाला.
जळगाव ग्रामीणमधील पूल व रस्त्यांसाठी ३२.३१ कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. “रस्ते व पूल मजबूत असतील, तर वाहने गतिमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते फक्त दळणवळणासाठी नाही, तर जनतेचे आयुष्य सुकर करण्यासाठी उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावे जोडली जातील. रस्त्यांच्या विकासामुळे गावागावापर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोचतो. रस्ते, पुलांची कामे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, या निधीतून पूल व रस्त्यांचा होणारा विकास ग्रामीण व शहरी भागासाठी वरदान ठरणारा आहे.” – गुलाबराव पाटील, पालकमंत्री