जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नसून अशातच जळगाव शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना, तुलनेत शिवसेनेच्या शिंदे गटात इतके दिवस बरीच शांतता होती. मात्र, आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावात ठाकरे गटाला एकापाठोपाठ धक्के बसताना दिसत आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवासेनेचे महानगरप्रमुख यश सपकाळे आणि गजू कोळी यांच्यासह सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. सर्वांनी पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या प्रसंगी केला. युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने जळगाव शहरात शिंदे गटाची ताकद वाढल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.











