भुसावळमध्ये लाखो रुपयांचा २१ किलो गांजा जप्त; दोन सख्ख्या भावांना अटक

मे 15, 2026 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे साडेचार लाखांचा तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली असून, मध्य प्रदेश आणि अकोला येथील दोन संशयित आरोपी फरार आहेत.या कारवाईमुळे आंतरराज्यीय गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ganja

मिळालेल्या माहितीनुसार, काल १४ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगावचे पोलीस अधीक्षक (SP) यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या घरात गांजा लपवून ठेवला आहे. एसपींच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत रामदास दरेकर यांनी तात्काळ पथकासह सापळा रचला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ताजनगरमधील शाळा क्रमांक ३ जवळील तडवी वाडा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी हा अवैध साठा उघडकीस आणला.

पोलिसांनी घराची झडती घेतली असता दोन गोण्यांमध्ये भरलेला हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. या गोण्यांवर हिरव्या रंगात ‘पराग ॲग्रो’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी हा माल मोजला असता तो तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम भरला. बाजारात या गांजाची अंदाजे किंमत २० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण ४ लाख ३९ हजार ४४० रुपये इतकी आहे.

या कारवाईत शेख अजिज अब्दुल मजिद उर्फ अच्चु (वय ४१) आणि त्याचा मोठा भाऊ सलीम मजिद शेख (वय ४५, रा. ताजनगर, भुसावळ) या दोघा भावांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हा गांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा माल भोपाळ येथील अनस आणि अकोल्यातील सिंधी वस्तीत राहणारा आदील खान यांच्याकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही संशयित सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now