⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मणिपूरच्या भूस्खलनात 7 लष्करी जवानांसह 14 जणांचा मृत्यू ; 25 जवान अद्यापही बेपत्ता

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर झालेल्या भूस्खलनात 7 लष्करी जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला. तर अजूनही २५ ते ३० जवान भूस्खलनात दबले गेलेत. बचावकार्य अजूनही सुरू असून या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अचानक डोंगराला तडे गेल्याने भारतीय लष्कराचा तळ उद्ध्वस्त झाला. ही घटना घडली तेव्हा छावणीत मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते.

डीजीपी पी डोंगल यांनी सांगितले की, 23 लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 7 लष्करी जवानांचा समावेश आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू असून या भूस्खलनाखाली लष्कराचे जवान, रेल्वे कर्मचारी, गावकरी आणि मजुरांसह सुमारे ६० जण अडकल्याची भीती आहे. काल दिवसभर चाललेल्या ऑपरेशननंतर 7 लष्करी जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मोठ्या संख्येने जवान बेपत्ता आहेत. ज्यांचा शोध सुरू आहे. छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त असून खराब हवामानामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.

पीएम मोदीही लक्ष ठेवून आहेत
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात इंफाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू आहे, त्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. टेरिटोरियल आर्मीच्या 107 कंपन्यांना भूस्खलनाचा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत, पंतप्रधान मोदींनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.