⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

हिस्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बंदीस्त वाड्यातील आठ शेळ्या ठार!

Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । प्रस्तावित मुक्ताई-भवानी अभयारण्य हद्दीलगत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे बंदीस्त गोठ्यातील तब्बल सात शेळ्या हिस्र वन्यप्राण्याकडुन ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तर एक दिवस आधी अशाचप्रकारे जखमी अवस्थेत एक शेळी मृत झाली होती. दरम्यान, वन्यप्राणी थेट गावात येऊन पाळीव पशुंवर हल्ला करत असल्याने पशुपालक चिंतेत आहे.

तालुक्यातील सुकळी येथील जि.प.शाळेमागे किशोर बाळु पाटील यांचा बंदीस्त वाडा आहे. या वाड्यात गायी-म्हैशीसह बैल व शेळ्या या वाड्यात बांधलेल्या असतात. काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट अथवा लांडगा किंवा कोण्यातरी हिस्र वन्यप्राण्याने लोखंडी गेटच्या खालील बाजुने आत प्रवेश करुन तब्बल सात शेळ्यांवर हल्ला चढवत ठार केल्या. यामुळे पशुपालक यांचे सुमारे एक लाखापर्यत नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पहाटे किशोर पाटील गोठ्यात पोहचताच हा प्रकार समोर आला. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, वडोदा वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांना ग्रामस्थ पवन पाटील यांनी भ्रम्हणध्वनीवरुन माहीती दिली.

वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी. जी. पाचपांडे, वनरक्षक विकास पाटील, वनमजुर संजय सांगळकर, योगेश कोळी यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरू असुन मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करणेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी सत्ये यांना पाचारण करण्यात आल्याची माहीती संबंधित सुत्रांकडुन ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ ला प्राप्त झाली.

दरम्यान एक दिवस आधी शेजारी साहेबराव दयाराम कोळी यांची एक शेळी अशाचप्रकारे जखमी अवस्थेत मृत झाली होती. मात्र, भटकृया कुत्र्यांचा हल्ला असावा या असा कयास लावला होता. पण दुसऱ्याच रात्री एकाचवेळी तब्बल सात शेळ्यावर हल्ला चढवत ठार केल्याने शिवाय घटनास्थळी हिस्र वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा आढळुन आल्याने हा हल्ला वन्यप्राण्यांचाच असल्याचे सिद्ध होत असून या हल्ल्यात किशोर पाटील यांचे एक लाखापर्यत नुकसान तर साहेबराव कोळी यांचे पंधरा हजारापर्यत नुकसान झाले आहे.