⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

वाहन विभागाचा निष्क्रिय कारभार : नागरिकांसाठी आमदारांनी दिलेली ॲम्बुलन्स ८ महिन्यांपासून बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ ।  जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी जळगाव शहर महानगरपालिकेला जळगाव शहरातील रुग्णांना सोयीचे ठरेल म्हणून दोन रुग्णवाहिका दिल्या होत्या. यातील एक रुग्णवाहिका गेल्या ८ महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत असून याकडे मनपा प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करत आहे.(mla rajumama bhole)

जळगाव शहराचा विचार करता जळगाव शहरात ‘ॲम्बुलन्स’ महाग दरात नागरिकांना उपलब्ध होतात. अशावेळी नागरिकांना स्वस्त दरात ॲम्बुलन्स उपलब्ध व्हावी यासाठी आमदार राजू मामा भोळे यांनी दोन ॲम्बुलन्स महानगरपालिकेला दिल्या होत्या. शहरभर कुठेही केवळ ८० रुपये दरात या अंबुलन्स नागरिकांना दिल्या जात होत्या. मात्र गेल्या ८ महिन्यापासून यातील एक ॲम्बुलन्स ही बंद आहे.(cheap rate ambulance in jalgaon)

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑगस्ट महिन्यात एम एच १९ सी वाय ६९९४ ही ॲम्बुलन्स इंजिन खराब झाल्याने बंद पडली. लगेचच ही ॲम्बुलन्स दुरुस्ती करण्यासाठी आरोग्य विभागाने वाहन विभागाकडे वर्ग केली. मात्र ८ महिने उलटूनही या ॲम्बुलन्सकडे कोणाचेही लक्ष नाही. वाहन विभागाला याबाबत विचारले असता वाहन विभागाने सांगितले की केवळ दोन महिन्यापासून ही ॲम्बुलन्स बंद आहे.व लवकरच हि ऍम्ब्युलन्स सुरु होईल. मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि, गेल्या ८ महिन्यापासून ही ॲम्बुलन्स बंद आहे.

वाहन विभागाच्या मते याबाबतची वर्कऑर्डर देण्यात आली असून लवकरच रुग्णवाहिका पुन्हा सुरू होणार आहे. मात्र प्रश्न हा उरतो की साधी वर्क ऑर्डर देण्यासाठी वाहन विभागाला ८ महिने का लागले?

याबाबत आमदार राजूमामा भोळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही ॲम्बुलन्स सुरू व्हावी यासाठी मी वेळोवेळी तक्रार करत आहे. नागरिकांच्या सुविधा व्हावी, नागरिकांची सोय व्हावी. यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठीच मी हि ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली होती. मात्र मनपा प्रशासनाची इच्छाशक्ती दिसत नाहीये.