जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मलकापूर-पिंपळगांव येथे घडली आहे. तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे. दोघांवर मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून एकास अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

मलकापूर आगारातून एसटी (क्र. एम.एच.४०/एन.९१२१) ही आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता निघाली होती. सकाळी ६.२० वाटेच्या सुमारास धावत्या एसटीचा चालकाच्या पाठीमागील बाहेर आलेल्या पत्र्याने विरूद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकल स्वार गणेश शंकर पवार (वय ३६, रा. पिंपरी गवळी) यांच्या हाताला जबर खरचटले व एसटी पुढे धावली. धावत्या एसटीच्या बाहेर निघालेल्या पत्र्याच्या कचाट्यात पुढे पोलिस भरतीसाठी धावत असलेला विकास गजानन पांडे (वय २२, रा. उर्रा) हा आला. बाहेर आलेल्या पत्र्याने त्याचा हात कलम केला तर त्याच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या. त्याची तब्येत खालावल्याने त्याला मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. याच घटनेत धावत्या एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्याने परमेश्वर आनंदा सुरडकर (वय ४५ रा.आव्हा) यांचा देखील हात कलम झाला. त्याचबरोबर पोटावर गंभीर जखमा झाल्या. त्यांचे आतडे बाहेर आल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

एसटी थेट पोलिसांत
या घटनेनंतर चालक देवराव भावराव सुर्यवंशी यांनी एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केली आहे. मलकापूर एसटीच्या स्थानकावर मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक द्वय सुखदेव भोरकडे व बालाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी एसटी स्थानकात दाखल होऊन परिस्थिती हाताळल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.












