उपमहापौरांच्या सावत्रपणाला कंटाळून बंडखोरांची घरवापसी!

ऑक्टोबर 14, 2021 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । शहर मनपामध्ये नवग्रह मंडळाचे प्रमुख उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. शिवसेनेला साथ देणाऱ्या बंडखोरांसोबत उपमहापौर कुलभूषण पाटील हे सावत्रपणाची वागणूक देत असल्यानेच आम्ही पुन्हा भाजपात परतलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली आहे.

kulbhushan-patil

जळगाव शहर मनपामध्ये ‘करेक्ट कार्यक्रम’ राबवित शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी मोठी खेळी खेळली होती. भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने मनपावर भगवा फडकवला होता. शिवसेनेच्या जयश्री महाजन व भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले होते.

गेले काही महिने सर्व सुरळीत चालल्यानंतर आज अचानक चक्रे फिरली आणि १० बंडखोर पुन्हा भाजपात परतले आहे. मविआचा करेक्ट कार्यक्रम जळगावात फसला असून पुन्हा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपात परतलेल्या बंडखोरांशी जळगाव लाईव्हने संपर्क साधला असता, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आम्हाला प्रभागातील कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधी दिला जात होता परंतु तो ३० नगरसेवकांना समान वाटप न करता उपमहापौर स्वतःच्या जवळच्या नगरसेवकांना देत होते. उपमहापौरांनी स्वतःच्या प्रभागात देखील साडेपाच कोटींचा निधी टाकून घेतला. मनपातील काही पदे देखील जवळच्या नगरसेवकांना देण्याचा त्यांचा विचार होता मात्र आम्ही त्यास विरोध दर्शवित ईश्वर चिठ्ठीची मागणी केली होती. शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांना आम्ही याबाबत गेल्या ३ महिन्यांपासून सांगत होतो मात्र ते केवळ आश्वासनच देत होते. उपमहापौर कुलभूषण पाटील पाटील हे सावत्रपणाची वागणूक देत असल्याने आम्ही पुन्हा भाजपात परतलो असल्याचे त्यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now