जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । युवासेनेत आम्ही गेल्या १० वर्षापासून काम करतो आहे. सहा महिन्यांपूर्वी आलेल्या जिल्हा संपर्क प्रमुखांना मिठाईचे बॉक्स आणि पाकिटे देणाऱ्यांना वरील पदावर नेले जात आहे. पक्षात आमच्यावर अन्याय होत असून आम्ही त्यामुळे २०० पदाधिकारी पदाचे राजीनामे देत आहोत, असे युवासेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी, तालुका प्रमुख चेतन पाटील यांच्यासह जवळपास ८० पदाधिकारी सध्या सोबत असून २०० पदाधिकारी यांनी राजीनामा देत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.गुलाबराव पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगितले. अजिंठा विश्रामगृह येथे युवासेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
शिवराज पाटील म्हणाले, आम्ही पक्षात गेल्या दहा वर्षापासून काम करीत आहोत. पक्ष संघटन वाढवण्यासाठी आणि पक्षाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे आम्ही पालन केले आहे. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग नोंदविला आहे, असे असताना देखील आम्हाला पदे देण्याचा अधिकार नाही. जिल्हा संपर्कप्रमुख आमच्या मतदारसंघात येतात परंतु आम्हाला कार्यक्रमासाठी बोलवत देखील नाही. विभागीय सचिवांकडे देखील आम्ही यापूर्वी याबाबत तक्रार केली असून त्यांनी आमची दखल घेतली नाही. पक्षात सहा महिन्यांपूर्वी आलेल्या विराज कावडिया याला राज्य पातळीवर पदे दिली जातात. पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय असल्याचे, शिवराज पाटील म्हणाले.