⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तरुणाईचा जोश, दंगल आणि हरवलेली पोलिसींग!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात रविवारी दोन ठिकाणी दंगलीसारखा प्रकार होऊन दगडफेक झाली. दोन जातीय समुदायात आणि विशेषतः संवेदनशील परिसरात हा प्रकार घडला. देशभरात समाजातील चांगल्या-वाईट घटनांची माहिती ठेवण्यासाठी गोपनीय शाखा कार्यरत असते. रविवारी झालेल्या प्रकारानंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य कळले असते तर स्थानिक पोलिसांच्या मदतीनेच वाद आटोक्यात आणला गेला असता.तरुणाईचा असलेला जोश सत्कार्यात आणि समाजोद्धारात दाखवला तर विधायक कार्य घडतील परंतु तेच कुठेतरी विरोध दर्शविण्यासाठी वापरला तर अंगावर गुन्हे ओढवले जातील.

आजकालच्या तरुणाईचे संपूर्ण जग सोशल मीडियाशी संबंधित आहे. सोशल मीडियात आलेल्या एखाद्या मेसेजवर विश्वास ठेवायचा आणि तेच घेऊन पळत सुटायचे. सध्या काही दिवसापासून विशिष्ट वर्ग जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि भावना भडकविण्याचा प्रयत्न करतोय. नेमके तसेच संदेश प्रसारित केले जात आहेत. शिक्षणाचा अभाव आणि योग्य विचारधारा नसल्याने समाजातील समाजकंटक कोण हेच तरुणांनाओळखता येत नाही. त्याचमुळे तरुणाईपासून खरे समाजकंटक दूर राहतात आणि दुसरेच आपले दुश्मन होऊन बसतात अशी सध्या परिस्थिती आहे.

रविवारी जिल्ह्यात सर्व सुरळीत सुरु असताना सायंकाळी हरिविठ्ठलनगर आणि रात्री शनिपेठ परिसरात जातीय तेढ निर्माण झाला होता. हरिविठ्ठल नगरात फोटो शूट करण्याच्या कारणावरून तर शनिपेठेत उसनवारीच्या पैशातून हा वाद झाला होता. कुणाला काही कळण्याच्या आतच दगडफेक झाली आणि दंगलीचे स्वरूप मिळाले. दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करीत घोषणाबाजी देखील केली जात होती. दंगेखोर तरुणांची परिस्थिती लक्षात घेता कुणीही घरचे श्रीमंत किंवा नोकरदार नव्हते. कुठेतरी हातमजुरी आणि रोजंदारी करत घराचा उदरनिर्वाह चालविणारे ते आहेत. दंगलीच्या विस्तवाचे चटके ज्यांनी सहन केले आहेत असे चेहरे दंगलीत दिसून आले नाही. सद्सदविवेकबुद्धी जागरूक ठेवत आपले चांगले काय आणि वाईट काय हे जाणले असते तर कदाचित काल झालेले प्रकार आणि त्याचे परिणाम रोखता आले असते.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गोपनीय पथक सतत माहिती काढत असते. विशेषतः काही संवेदनशील विषय देशभरात असेल तेव्हा ते जास्त कार्यरत असतात. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी नेमके उलट झाले. किरकोळ वाद पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असताना देखील त्यांना खबर मिळाली नाही. काहींना समजले तरी पोलीस त्याठिकाणी पोहचू शकले नाही. रविवार आणि त्यातच पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी. दगडफेक सुरु झाल्यावर अवघ्या ५-६ कर्मचाऱ्यांसमोर ५०-६० तरुणांचा गट होता, तरीही त्यांनी खिंड लढवली. शनिपेठचे सेनापती तर सरसेनापती हजर झाल्यानंतर पोहचले. मोठा फौजफाटा हजर झाल्यावर दंगेखोर पळाले आणि मग बचावाचे मार्ग शोधू लागले.

अवघ्या अर्ध्यातासाच्या काळात तरुणाईने बेफाम जोश दाखवला. पोलिसांनी धरपकड सुरु केल्यावर मात्र तर पळत सुटले. गुन्हा दाखल झाला. ८ तरुण निष्पन्न झाले असले तरी संशयितांची यादी ३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हातावर पोट असलेली हि तरुणाई कारागृहात गेल्यावर त्यांचा सर्व जोश ठिकाणावर येतो. कुटुंबीय पोलीस ठाणे, कारागृहाच्या फेऱ्या मारत बेजार होतात. आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण परिवार त्याचे परिणाम भोगतो. हरवलेली पोलीसिंग पुन्हा आणल्यास कुठेतरी गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. जागोजागी असलेले अवैध धंदे, पोलिसांना लागणारे बंदोबस्त, नोटीस बजावण्याची कामे यामुळे देखील खरी पोलिसिंग करण्यास वाव मिळत नाही.