जळगाव लाईव्ह न्यूज । कुसुंबा-जळगाव रोडवरील धनदाई माता मंदिराजवळ एका भरधाव अज्ञात दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी घटना घडली. अक्षय राजेश पाटील (२७) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर संबंधित दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलीस कॉलनी (एमआयडीसी) येथे राहणारा अक्षय पाटील हा धनदाई माता मंदिरासमोरून ‘लकी फर्निचर’ दुकानाच्या दिशेने पायी रस्ता ओलांडत होता. याच वेळी कुसुंबाकडून जळगावकडे येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी चालकाने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवून अक्षयला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अक्षयला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर जखमीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी दुचाकी चालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच अक्षयचे वडील राजेश विठ्ठल पाटील यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार चालकाचा शोध सुरू आहे.











