जळगावात शस्त्रासह फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टा, काडतुसांसह इलेक्ट्रिक मोपेड जप्त

जुलै 17, 2026 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२६ । जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. अभिषेक संजय हवलदार (वय २३), रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव (मूळ रा. बुधवार पेठ, सोलापूर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या कारवाईत आरोपीकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि एक बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

abhishekha havaldar

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना अयोध्यानगर परिसरात एक तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वेळेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अयोध्यानगर ते गौरव हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर तात्काळ सापळा रचला.

सापळा लावलेला असतानाच समोरून बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेडवर एक संशयित तरुण येताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

या कारवाईत आरोपीकडून सुमारे २० हजार रुपयांचा गावठी कट्टा, दोन हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे आणि एक लाख रुपयांची बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now